सहा कोटींचा निधी; संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन दालन अन् आधुनिक सभागृह उभारणार — मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटनाची घोषणा
कापूरहोळ
मराठी माणसाच्या हास्याला अस्सल ग्रामीण ढंगाची फोडणी देत चित्रपटसृष्टीत स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते स्व. दादा कोंडके यांच्या स्मृती आता इंगवलीत भव्य रूप धारण करणार आहेत. दादा कोंडके यांच्या स्मारकाच्या उभारणीचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला. या स्मारकामुळे इंगवलीच्या सांस्कृतिक ओळखीला नवी झळाळी मिळणार आहे.
दादा कोंडके हे नाव केवळ एका अभिनेत्याचे नाही, तर मराठी चित्रपटसृष्टीतील एका स्वतंत्र पर्वाचे आहे. त्यांच्या विनोदाची शैली, मराठमोळी भाषा, ग्रामीण जीवनाशी जोडलेली मांडणी आणि अभिनयाची वेगळी ढब आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृती जपणारे हे स्मारक उभे राहणे ही केवळ इंगवलीसाठी नव्हे, तर संपूर्ण मराठी कलाविश्वासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.
स्मारकासाठी सहा कोटींची तरतूद
भूमिपूजन सोहळ्यात ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्मारकासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली.दादा कोंडके यांच्या कलाकृती, त्यांचा संघर्ष, चित्रपटसृष्टीतील योगदान आणि मराठी संस्कृतीशी असलेले त्यांचे नाते भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम या स्मारकातून केले जाणार आहे. त्यामुळे हे स्मारक केवळ पर्यटनस्थळ न राहता मराठी कला-संस्कृतीच्या अभ्यासाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संग्रहालयातून उलगडणार दादांचा कलाप्रवास
स्मारकाच्या प्रस्तावित आराखड्यात संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन दालन आणि आधुनिक सभागृह यांचा समावेश आहे. दादा कोंडके यांच्या चित्रपटांचा प्रवास, त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे, छायाचित्रे, चित्रपटांशी संबंधित साहित्य आणि त्यांच्या कलाकृतींची माहिती या माध्यमातून जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.यामुळे विद्यार्थी, संशोधक, चित्रपट अभ्यासक आणि कलारसिकांना दादा कोंडके यांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
‘उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार’
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील, अशी माहिती जयकुमार गोरे यांनी दिली. त्यामुळे स्मारकाच्या भूमिपूजनानंतर आता त्याच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.
मान्यवरांकडून दादा कोंडकेंच्या कार्याला उजाळा
आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी दादा कोंडके यांच्या कलावारशाचा गौरव करत स्मारकामुळे त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी आमदार शंकरभाऊ मांडेकर, भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब गरूड, प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, दिग्दर्शक व अभिनेते विजय कोंडके, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, सरपंच सारिका बांदल, उपसरपंच अमर गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंगवलीच्या पर्यटनालाही मिळणार चालना
दादा कोंडके यांच्या नावाने उभारले जाणारे हे स्मारक भोर तालुक्यातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळ आकारास येत आहे. स्मारकाच्या माध्यमातून दादा कोंडके यांच्या चाहत्यांसह महाराष्ट्रभरातील कलारसिक इंगवलीकडे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे स्मारकासोबतच परिसरातील पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगारालाही चालना मिळनार आहे.
दादांच्या विनोदाने महाराष्ट्राला हसवले; आता त्यांच्या आठवणींचा हा वारसा इंगवलीतून पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणार आहे. सहा कोटींच्या निधीतून उभे राहणारे हे स्मारक प्रत्यक्षात किती भव्य आकार घेते, याकडे आता संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

