कापूरहोळ
भोर तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भोंगवली–कामथडी गटातून भाजपकडून इच्छुक असलेले महादेव सोनावणे यांना भाजपचे अधिकृत तिकीट नाकारण्यात आले. या धक्क्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करत ‘धनुष्य’ चिन्हावर उमेदवारी स्वीकारली.
या अचानक निर्णयामुळे निवडणुकीतील सगळी राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. भाजपशी निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे किसनराव सोनावणे यांनी मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे भाजपच्या स्थानिक गोटात नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) या संधीचे सोने करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
भोंगवली–कामथडी गटात आधीच प्रतिष्ठेची लढत असताना, अखेरच्या क्षणी पक्षबदल आणि चिन्ह बदल मतदारांवर किती परिणाम करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. घाईत हाती घेतलेले धनुष्य अचूक लक्ष्य साधणार की मतदारांचा रोष ओढवणार? याचे उत्तर आता निवडणूक निकालच देणार आहेत.
एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे—या गटातील निवडणूक आता फक्त मतदानाची नाही, तर राजकीय अस्तित्वाची लढाई आहे.असे राजकीय जानकारांचे मत आहे

