भोंगवलीतील सोलर प्रकल्पावर अज्ञात जमावाचा हल्ला; मशिनरी, वाहने आणि कार्यालयाची जाळपोळ

Rajtorannews
कापूरहोळ वार्ताहर

भोर तालुक्यातील भोंगवली येथे सुरू असलेल्या प्रस्तावित सोलर वीज उपकेंद्र प्रकल्पावर शनिवारी (१ ऑगस्ट) पहाटे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० जणांच्या अज्ञात जमावाने धाडसी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हल्लेखोरांनी कंपनीची जेसीबी, मशिनरी, वाहने, जनरेटर आणि कार्यालयाची जाळपोळ करत मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घटनास्थळी असलेल्या कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांचे मोबाईल हिसकावून फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, काही हल्लेखोरांच्या हातात तलवारी, कोयते आणि गावठी पिस्तूल होते. काही कामगारांच्या अंगावर पेट्रोल-डिझेल टाकून जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
भोंगवली येथील या सोलर प्रकल्पाला गेल्या काही दिवसांपासून स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून त्यासाठी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

दरम्यान, घटनास्थळावरील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करण्यात आली असली तरी काही डीव्हीआर पोलिसांच्या हाती सुरक्षित लागले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण भोर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून सोलर प्रकल्पाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
To Top