भोरकरांचा सवाल – विकासासाठी निवडले की वादासाठी ? पालिकेतील संघर्ष चव्हाट्यावर

Rajtorannews
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचे केबिन सील

भोर 
भोर नगरपालिकेतील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींमधील वाद आता टोकाला पोहोचला असून, मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि  नगरसेवकांच्या केबिनला सील ठोकण्यात आल्याने पालिका परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शहराच्या विकासकामांपेक्षा अंतर्गत संघर्षालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

भोर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने लोकप्रतिनिधींना निवडून दिले. मात्र, विकासकामे, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी पालिकेत राजकीय संघर्ष, आरोप-प्रत्यारोप आणि वाद यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र समोर येत आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी थेट लोकप्रतिनिधींच्या केबिनवर सील लावण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील संघर्ष उघडपणे समोर आला आहे. या घटनेचा परिणाम पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर आणि विकासकामांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, "भोरचा विकास होणार की अशीच पाच वर्षे वादात जाणार?", असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. निवडणुकीपूर्वी स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे हेच खरे रूप आहे का, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
राजकीय वाद, गोंधळ आणि सत्तासंघर्षामुळे शहरातील विकासकामे रखडू नयेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे भोरकरांचे लक्ष लागले आहे.
To Top