राजगड पोलिसांना चोरट्यांचे खुले आव्हान; कासुर्डीत तीन दुकाने फोडली, CCTV हार्डडिस्कही गायब

Rajtorannews
कापूरहोळ : 
भोर-कापूरहोळ मार्गावरील कासुर्डी (गुंजन मावळ) येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी करत एकाच रात्रीत तीन दुकाने फोडून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीनंतर दुकानांतील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्कही चोरून नेल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांनी राजगड पोलिसांसमोर थेट आव्हान उभे केले आहे.

कासुर्डी स्टॉप परिसरातील नवनाथ मालुसरे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या गाळ्यांमध्ये ही चोरी झाली. चोरट्यांनी दुकानांच्या वरील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत दिपक मांगडे यांचे 'सदगुरु मेडिकल', विशाल मांढरे यांचे 'श्री समर्थ कृषी सेवा केंद्र' आणि सुप्रिया जांभळे यांचे 'अनुष्का कलेक्शन' या दुकानांमधून रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य चोरून नेले. प्राथमिक माहितीनुसार या चोरीत सुमारे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी चोरीनंतर दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची हार्डडिस्कही सोबत नेली. त्यामुळे तपास दिशाभूल करण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, त्याच इमारतीतील गुंजवणी डिजिटल सेवा केंद्र, वनिता वडेवाले आणि आशीर्वाद चायनीज सेंटर या दुकानांना कोणतीही हानी पोहोचली नसल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि स्थानिकांकडून माहिती संकलित करून तपास सुरू करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

या धाडसी चोरीनंतर कासुर्डी व परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर तातडीने कारवाई करावी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
To Top