३४ वर्षांपासून प्रलंबित भोर एम आय डी सी चा प्रश्न निकाली;

Rajtorannews
भोर एमआयडीसीबाबत मोठा निर्णय! उत्रोली–वडगाव डाळ येथील २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली

भोर, प्रतिनिधी : 
भोर तालुक्यातील उत्रोली आणि वडगाव डाळ परिसरातील शेतकरी व जमीन धारकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. भोर औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) उभारण्यासाठी २१ ऑक्टोबर १९९२ रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या मौजे उत्रोली व वडगाव डाळ येथील एकूण २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

या क्षेत्रामध्ये २९१.३३ हेक्टर खासगी तर २.०० हेक्टर सरकारी जमीन समाविष्ट आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने १७ जून २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून, १६ जून २०२६ रोजी शासन राजपत्रातही याची नोंद प्रकाशित करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे संबंधित २९३.३३ हेक्टर जमीन एमआयडीसी संपादनाच्या कक्षेतून अधिकृतपणे मुक्त झाली आहे. तसेच या निर्णयानुसार महसूल अभिलेखांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

गेली अनेक दशके एमआयडीसीच्या प्रस्तावित संपादनामुळे या परिसरातील जमीनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. जमीन व्यवहार, विकासकामे तसेच मालमत्तेच्या वापराबाबत अनेक मर्यादा निर्माण झाल्या होत्या. अखेर शासनाच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून, उत्रोली व वडगाव डाळ परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्थानिकांच्या मते, या निर्णयामुळे जमिनीवरील अनिश्चितता दूर होणार असून भविष्यात जमीन व्यवहार, विकासकामे आणि शेतीविषयक निर्णय अधिक सुलभ होतील. या निर्णयमुळे भोर  एम आय डी सी विषयावर होणारे राजकारण संपुष्ठात आले आहे.
To Top