महामार्ग सुरक्षा पथक व राजगड पोलिसांची संयुक्त कारवाई; चोरीची इर्टिगा जप्त, तीन आरोपी ताब्यात
कापूरहोळ
दि. ९ जुलै रोजी महामार्ग सुरक्षा पथक ट्राफिक ऍड पोस्ट (TAP) आणि राजगड पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत भिवंडी (मुंबई) येथून चोरीस गेलेली मारुती सुझुकी इर्टिगा कार जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष व राजगड पोलीस ठाणे यांना भिवंडी येथून चोरीस गेलेली मारुती सुझुकी इर्टिगा (क्र. MH 04 KR 2357) ही कार खेड शिवापूर टोलनाका पार करून साताऱ्याच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सारोळा ट्राफिक ऍड पोस्ट चे प्रभारी एपीआय हणमंत पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापूरहोळ तालुका भोर येथील महामार्ग चौकात राजगड पोलिसांच्या समन्वयाने तात्काळ नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदीदरम्यान संशयित वाहन अडवून तपासणी करण्यात आली. तपासात सदर वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कार जप्त करण्यात आली. वाहनातील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई सारोळा ट्राफिक ऍड पोस्ट TAP चे प्रभारी एपीआय हणमंत पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल निलेश ओव्हाळ, हेड कॉन्स्टेबल सय्यद, निगडे, पाटोळे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव तसेच राजगड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पाडळकर व पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे यांच्या समन्वयाने यशस्वीपणे पार पडली.
महामार्ग सुरक्षा पथक आणि राजगड पोलिसांच्या तात्काळ प्रतिसाद, सतर्कता आणि उत्कृष्ट समन्वयामुळे चोरीचे वाहन जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात यश आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

