वरंधा घाटात अवजड वाहनांना दोन महिने बंदी;

Rajtorannews
रेड-ऑरेंज अलर्टमध्ये सर्व वाहतूक ठप्प

भोर प्रतिनिधी 

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुड्डी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत वरंधा घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाकडून रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी झाल्यास त्या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विकास खरात यांनी दिली.
वरंधा घाटातील येडशी, वारवंड आणि शिरगाव परिसरात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्त्याचा काही भाग खचला आहे. सध्या घाट रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून अनेक ठिकाणी मोऱ्यांची कामे सुरू आहेत. पर्यायी रस्ते तयार करण्यात आले असले तरी ते पावसाच्या पाण्याखाली वाहून जाण्याची शक्यता असल्याने घाटातील वाहतूक अधिक धोकादायक बनली आहे.

या पार्श्वभूमीवर भोर पोलिस निरीक्षक निलेश माने, उपविभागीय दंडाधिकारी, निवासी नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. पाहणीत एका बाजूला उंच कड्यावरून मोठ्या दगडांसह दरडी कोसळण्याचा धोका, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने वाहतूक अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वीही पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे वरंधा घाटात दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता वाहून जाणे अशा घटना घडून जीवित व वित्तहानी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील झाडे आणि माती रस्त्यावर येण्याची शक्यता अधिक असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

उपविभागीय अधिकारी विकास खरात यांनी सांगितले की, रेड किंवा ऑरेंज अलर्ट नसलेल्या कालावधीत वरंधा घाट फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील. मात्र, हवामान विभागाने रेड अथवा ऑरेंज अलर्ट जारी केल्यास सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करण्यात येईल.

प्रशासनाने नागरिक, पर्यटक आणि मालवाहतूकदारांना आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, पर्यायी मार्गांचा वापर करूनच प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
To Top