भोर, प्रतिनिधी :
भोर-वरंधा घाटात शुक्रवारी ता. 3 रोजी दरड कोसळल्याने तात्पुरती बंद करण्यात आलेली वाहतूक अवघ्या चार तासांत पुन्हा सुरळीत करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वयातून युद्धपातळीवर काम करून रस्त्यावर पडलेली माती व दगड हटविण्यात आले. त्यानंतर घाटातील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
शुक्रवारी दि 3 रोजी घाटात दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेला मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.
अवघ्या चार तासांत रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आल्याने अडकून पडलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, घाट परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगून प्रवास करावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पावसाळ्यात वरंधा घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी रस्त्याची स्थिती जाणून घेऊनच घाटमार्गाचा वापर करावा, असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

