भोर-वरंधा घाटात दरड कोसळली; वाहतुकीस तात्पुरता बंद

Rajtorannews
भोर, प्रतिनिधी : 
भोर तालुक्यातील वरंधा घाटात शुक्रवारी अचानक दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. दरड आणि दगडराशी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आल्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला.
घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेली माती व दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, घाटमार्ग बंद असल्याने भोर–महाड मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय वरंधा घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. रस्ता पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
To Top