पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन

Rajtorannews

कापूरहोळ 

.       पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ राजकीय नेते आणि ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले नेतृत्व म्हणून जालिंदर कामठे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

.         कोंढवा बुद्रुक परिसरातून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच ग्रामीण भागातील प्रश्न, शेतकरी, शिक्षण, पाणीपुरवठा आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केले. लोकसंपर्क, संघटनकौशल्य आणि कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याची त्यांची शैली ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खास ओळख ठरली.

.       सन १९९७ मध्ये ते पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांची पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा योजना आणि ग्रामविकासाच्या विविध कामांना गती दिली. त्यांच्या कार्यकाळात विकासाभिमुख आणि समन्वयवादी नेतृत्वाची छाप उमटली.

.       राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली. पुढे ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षही राहिले. नंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पुणे जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी काम केले. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांनी पुन्हा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

.         वसंतदादा पाटील यांच्या विचारांनी प्रेरित असलेले कामठे यांनी शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध, सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद आणि संयमी नेतृत्व यामुळे त्यांना राजकीय वर्तुळात विशेष मान मिळाला.

.       ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणारे आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
To Top