नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात दोषीला मरेपर्यंत फाशी

Rajtorannews
अवघ्या ५५ दिवसांत न्याय
कापूरहोळ 
नसरापूर तालुका भोर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी हा गुन्हा "दुर्मिळात दुर्मीळ" स्वरूपाचा असल्याचे नमूद करत कठोरातील कठोर शिक्षा सुनावली.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, आरोपीने अल्पवयीन आणि असहाय्य मुलीवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार करून तिची हत्या केली. शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि 55 साक्षीदारांच्या साक्षींमुळे गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाला. आरोपीमध्ये सुधारण्याची शक्यता नसल्याने फाशीची शिक्षा योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या खटल्यात पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या जलद तपासाचेही न्यायालयाने विशेष कौतुक केले. गुन्ह्यानंतर अवघ्या १६ दिवसांत सुमारे १,२०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी केली होती.
१ मे २०२६ रोजी घडलेल्या या अमानुष घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आता अवघ्या ५५ दिवसांत तपास, खटला आणि शिक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हे प्रकरण देशातील सर्वात वेगाने निकाली निघालेल्या गंभीर गुन्ह्यांपैकी एक ठरले आहे.
"निरागस चिमुरडीला न्याय मिळाला, पण भरून न निघणारी पोकळी कायम राहील," अशी भावना निकालानंतर अनेक नागरिकांनी व्यक्त केली.न्यायालयाच्या या निकालाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून पोलिसांनी तत्परतेने तपास करून भक्कम पुरावे कोर्टात सादर केल्याने कौतुक होत आहे.  
To Top