जिद्द-मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात
१० युवकांचा भोर नगरपालिकेत भव्य सत्कार
भोर
पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस दलात निवड झालेल्या भोर तालुक्यातील युवकांचा भोर नगरपालिकेत गुरुवारी (दि.९) उत्साहपूर्ण सत्कार सोहळा पार पडला. नगरपालिकेतील श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प देऊन या युवकांचा सन्मान करण्यात आला.आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही खडतर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अपार मेहनतीच्या जोरावर या युवकांनी पोलीस भरतीत यश मिळवले. प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाने आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले. तालुकाभरातून या युवकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या सत्कार सोहळ्यात ओम शिंदे, रोहित किरवे, प्रेम महांगरे, भगवान गोरे, ओंकार मोरे, अक्षय चोरगे, शिवाजी शिंदे, सौरभ झुंजारे, आकाश भेलके आणि गौरव चंदनशिव या दहा युवकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष रामचंद्र आवारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा करत समाजासाठी आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संदीप शेटे, अतुल काकडे, बाळाभाऊ शेटे, राजेंद्र शिंदे, जावेद शेख, स्वप्नील तारू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अतुल काकडे यांनी केले.

