अडबलसिद्धनाथ गाडेबगाड उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी

Rajtorannews
कापूरहोळ

भोर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या धागंवडी येथे प्रसिद्ध श्री अडबलसिद्धनाथाच्या गाडेबगाड यात्रा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळली. पुणे जिल्ह्यातून हजारो भाविकांनी या उत्सवासाठी हजेरी लावून श्री अडबलसिद्धनाथाचे दर्शन घेतले.

धागंवडी (ता. भोर) येथील पांडवकालीन  श्री अडबलसिद्धनाथ मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थात हनुमान जयंती निमित्त गुरुवार (दि. २) रोजी येथे पारंपरिक गाडेबगाड यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. सकाळी होमहवन, पूजा व आरतीचे धार्मिक कार्यक्रम झाल्यावर  निगडे गावातील म्हखाळेदेवीची मानाची काठी व पालखी दुपारी पाचच्या सुमारास धांगवडी येथे येऊन अडबलसिद्धनाथाच्या गाडेबगाडाला भेट झाली. त्यानंतर ढोल-ताशे, बँडबाजा व फटाक्यांच्या आतषबाजीसह गाडेबगाड उत्सवाची मिरवणूक धांगवडी गावातून वाजतगाजत पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या अडबलसिद्धनाथाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातलण्यात आली.

 बैलांच्या सहाय्याने सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री अडबलसिद्धनाथ मंदिरापर्यंत गाडेबगाड ओढत नेण्यात आला. या गाडेबगाडावर दोन मानकरी बसवून पारंपरिक पद्धतीने फिरवत मंदिरापर्यंत नेऊन देवदर्शन घडविण्यात आले.गाडेबगाड मंदिराकडे जात असताना पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी राजगड पोलीस व सारोळा महामार्ग वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक व्यवस्था केली होती.तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या उत्सवासाठी परिसरातील मान्यवर, ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गाडेबगाड सोहळा आणि श्री अडबलसिद्धनाथाचे दर्शन घेतले. अडबलसिद्धनाथ मंदिराचे पुजारी गोविंद मांडके यांनी सांगितले की, देवस्थान जागृत असल्याने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, त्यामुळे दर रविवारी व सुट्टीच्या काळात तसेच यात्रा उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी असते.
To Top