किवत तालुका भोर येथे शुक्रवार (दि. १०) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विघ्नेश अजित चव्हाण (वय ४) या निष्पाप चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, विघ्नेश सकाळी घराबाहेर लघुशंकेसाठी गेला असता त्याला पायाला काहीतरी चावल्याची घटना घडली. काही वेळानंतर त्याच्या पायाला तीव्र वेदना जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तत्काळ भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. उपस्थित नागरिक आणि नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण, रमेश पवार, सचिन पवार व योगेश कुमठे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार विषारी सर्पदंशामुळे मृत्यू झाला असावा असे सांगितले, परंतु अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचेही नमूद केले .
या दुर्दैवी घटनेमुळे किवत गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. चार वर्षांच्या चिमुकल्याचा असा अकाली अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

