कापूरहोळ
नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या नवसह्याद्री महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे बळ मिळणार असून विद्यार्थ्यांना अधिक आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके यांनी दिली.
केळवडे तालुका भोर येथील नवसह्याद्री महाविद्यालयातील अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर पदवी, एमबीए व एमसीए व पीएचडी संशोधन केंद्र, बीबीए, बीसीए या महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळाला आहे. भोर तालुक्यातील स्वायत्त असलेले नवसह्याद्री हे पहिले महाविद्यालय ठरलं आहे. स्वायत्ततेमुळे बदलत्या तंत्रज्ञान आणि उद्योगाच्या गरजेनुसार अभ्यासक्रम वेळोवेळी अद्ययावत करता येणार असल्याची माहिती संस्थेचे ग्रुप डायरेक्टर सागर सुके यांनी दिली आहे.
महाविद्यालय प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, स्वायत्ततेमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर अधिक भर देता येईल. तसेच संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता यांना चालना मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांमध्येही या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून, उच्च दर्जाचे शिक्षण आणि अधिक संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वायत्ततेच्या माध्यमातून नवसह्याद्री महाविद्यालयाने शैक्षणिक उत्कृष्टतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, येत्या काळात हे महाविद्यालय राज्यातील अग्रगण्य संस्थांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महाविद्यालयास स्वायत्त दर्जा मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके, उपाध्यक्षा प्रा. सायली सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, आणि सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे सर्वांनी अभिनंदन केले.

