कापूरहोळ :
मोरवाडी तालुका भोर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनीने राज्यस्तरावर दिमाखदार कामगिरी करत गावाचा मान उंचावला आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या ईश्वरी मनोज मोरे हिने वर्ड पॉवर चॅम्पियनशिप स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
लीप फॉरवर्ड संस्थेने राज्य शासनाच्या मान्यतेने राज्यात मराठी शाळांतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी गुणवत्तावाढीसाठी हा उपक्रम राबवला होता. इंग्रजी वाचन आणि आकलन क्षमतेवर आधारित या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ईश्वरीने आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.ईश्वरीच्या या यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार सोहळा पार पडला. मुंबईहून पाठविण्यात आलेल्या बक्षिसांमध्ये स्टडी टेबल, टिफिन बॉक्स, मिल्टन वॉटर बॉटल, स्कूल बॅग, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन तिचा गौरव करण्यात आला.
याच स्पर्धेत प्रांजल जालिंदर साळुंके हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या यशात आणखी भर घातली.
या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सुतार, वर्गशिक्षक अरुण होडशिळ तसेच शिक्षक बाळासाहेब गायकवाड व सुरेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
ईश्वरीच्या यशामुळे मोरवाडी गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
मुख्याध्यापिका वैशाली सुतार म्हणाल्या की, अनेक पालकांची आर्थिक परस्थिती नसताना पालक इंग्रजी माध्यमंच्या शाळेत पाल्याला घालतात बऱ्याचदा त्यांचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण अपूर्ण राहते. त्यामुळे विद्यार्थीना धड मराठी येत नाही आणि इंग्रजी येत नाही त्यामुळे वेळनिघून गेल्यावर पालकांना पश्चातापाला सामोरे जावे लागते इंग्रजी शाळेच्या तुलनेत आमच्या मराठी माद्यमाच्या शाळा कमी नाहीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवता येते, हे ईश्वरीने सिद्ध करून दाखवले आहे.

