राजगड (प्रतिनिधी) –
राजगड तालुक्यातील घेवंडे येथे रविवारी (दि. १२) दुपारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शेतीसाठी कृषिपंप बसवित असताना विजेचा जोरदार धक्का बसून दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, निव्ही-घेवंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड (वय ५०) आणि त्यांचे बंधू दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड (वय ५५) हे दोघे शेतासाठी कृषिपंप बसवण्याचे काम करत होते. यावेळी अचानक विजेचा तीव्र धक्का बसल्याने दोघांचा तोल गेला आणि ते खोल पाण्यात पडले. यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. वेल्हे पोलीस स्टेशन मार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पोलीस अधिकारी अमित देशमुख, राजेंद्र आवदे, शुभम कदम तसेच बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी सुमारे ६.३० वाजता दामाजी गायकवाड यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.मात्र, अंधार पडल्यामुळे दत्तात्रेय गायकवाड यांचा मृतदेह सापडू शकला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती.सोमवारी (दि. १३) सकाळी पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या बचावकार्यात तानाजी भोसले, गणेश सपकाळ (पोलीस पाटील), उत्तम पिसाळ, विक्रम बिरामने, संदीप सोलस्कर, संजय चोरघे, समीर जाधव यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.या दुर्दैवी घटनेमुळे घेवंडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

