किकवी तालुका भोर येथे शेळींच्या चाऱ्यासाठी झाडावरील पाला काढतांना विजेचा जबरदस्त धक्का लागल्याने गणेश रामय्या भंडारी (वय अंदाजे २३, रा. किकवी, ता. भोर) याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार गणेश भंडारी हा शेळीपालन करून आपला उदरनिर्वाह करीत असे . शुक्रवारी दि 10 रोजी दुपारी शेळ्यांसाठी चारा घेण्यासाठी किकवी येतील एका झाडावर चढले. झाडाची फांदी पाला काढतांना महावितरणच्या वीजपोलवरील तारेला स्पर्श झाली आणि गणेशला विजेचा जोरदार धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.डोळ्यांसमोर घडलेल्या या दुर्घटनेने त्यांचे नातेवाईक व शेजारील लोक स्तब्ध झाले.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ महावितरण अधिकाऱ्यांना कळवले. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. ही दुर्घटना वीजतारेच्या जवळ झाडावर चढल्याने घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे महावितरणच्या वीजतारांच्या सुरक्षित अंतराबाबत चर्चा सुरू झाली आहे. गणेश भंडारी यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील शेतकरी व शेळीपालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे .

