भोर पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या मनीषा कंक तर , विशाल कोंडे उपसभापती

Rajtorannews
भोर : 
भोर पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडीत आज मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर सभापती पदाची निवड ‘ईश्वरी चिठ्ठी’वर ठरली. या नाट्यमय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा कंक यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्या सभापतीपदी विराजमान झाल्या, तर विशाल कोंडे यांची उपसभापतीपदी निवड झाली.

पंचायत समितीचे सभापतीपद यावेळी ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी राखीव होते. भोर तालुक्यात एकूण ८ गण असून पंचायत समितीत दोन्ही प्रमुख पक्षांचे संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने निवडणूक चांगलीच रंगली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून तृप्ती खुटवड व मनीषा कंक, तर भाजपकडून गीता आंबवले व सुषमा चव्हाण या चार महिला उमेदवार मैदानात होत्या. मात्र मतदानानंतरही दोन्ही बाजूंचे संख्याबळ समान राहिल्याने अखेर नियमानुसार ‘ईश्वरी चिठ्ठी’ काढण्यात आली. या चिठ्ठीत मनीषा कंक यांच्या नावाला कौल मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जल्लोष उसळला. आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळाल्याचे बोलले जात आहे.

सलग तिसरे अपयश
भोरच्या राजकारणात माजी आमदार संग्राम थोपटे यांना सलग तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भोर नगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत अध्यक्षपद मिळवले. आता पंचायत समितीवरही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाल्याने थोपटे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

To Top