कापुरव्होळ येथे १८ वर्षीय तरुणाचे अपहरण ा यंत्रणेच्या सतर्कतेने सुटका

Rajtorannews
कापूरहोळ : 

कापुरव्होळ ता. भोर येथील आनंद उद्योग समूहाचे उद्योजक लखनशेठ दळवी यांच्या १८ वर्षीय मुलाचे कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ३) दुपारी घडली. मात्र पोलिस यंत्रणा आणि ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तत्पर नाकाबंदीमुळे अवघ्या एका तासात अपहृत तरुणाची सुटका करण्यात यश आले. अपहरणकर्ते मात्र वापरलेली कार सोडून पसार झाले असून पुढील तपास सुरू आहे.

उद्योजक लखनशेठ दळवी यांचा मुलगा पृथ्वीराज दळवी (वय १८) हा दुपारी सुमारे दीड वाजता कापुरव्होळ येथील हॉटेलवरून दिवळे गावाजवळील त्यांच्या बंगल्याकडे जेवणासाठी निघाला होता. त्यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून सातारा दिशेने पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच वडील लखनशेठ दळवी यांनी आरडाओरड करत कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र कार वेगाने निघून गेली. त्यांनी तत्काळ शिरवळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 18002703600 वर संदेश दिल्याने पुणे व सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाणे आणि ग्रामसुरक्षा पथके सतर्क झाली. परिसरात तातडीने नाकाबंदी करण्यात आली.

अपहरणकर्त्यांची कार सारोळा–वीर–मांडकी (ता. पुरंदर) मार्गे जात असताना मांडकी येथे जेजुरी पोलिस व ग्रामसुरक्षा दलाने उभारलेल्या नाकाबंदीमुळे संशयितांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन ऊसाच्या शेतात घुसले. परिस्थिती बिघडल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी अपहृत पृथ्वीराज दळवी याला तेथेच सोडून पलायन केले.
पोलिसांनी घटनास्थळी एमएच 12 एक्स ई 5353 क्रमांकाची काळ्या रंगाची एक्सयूव्ही कार ताब्यात घेतली आहे. राजगड पोलिसांसह कुटुंबीयांनी तातडीने मांडकी येथे पोहोचून पृथ्वीराज याला सुरक्षित ताब्यात घेतले.

या प्रकरणी लखनशेठ दळवी यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून राजगड पोलिस आणि जिल्हा गुन्हेशाखा पुढील तपास करत आहेत.
To Top