‘सोनल वाईन्स’मधून १.४८ लाखांची रोकड लंपास, अज्ञात
खेडशिवापूर (ता. हवेली) –
खेडशिवापूर येथील पुणे–सातारा महामार्गालगत असलेल्या ‘सोनल वाईन्स’ या दारू दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकत तब्बल १ लाख ४८ हजार ८०० रुपयांची रोकड लंपास केली.
या प्रकरणी दीपक शंकर जगदाळे (वय ४०, रा. गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी रात्री ११.३० ते २ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.४५ या कालावधीत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर विविध काउंटरमध्ये ठेवलेली रोकड हातोहात साफ करण्यात आली. चोरी गेलेल्या रकमेमध्ये विविध मूल्यांच्या नोटा, नाणी तसेच सुट्टे देण्यासाठी ठेवलेल्या फाटक्या नोटांचाही समावेश असून एकूण रक्कम १,४८,८०० रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

