कापूरहोळ
भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक असताना राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीला उधाण आले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे प्रचाराची रंगत वाढली आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. विकासाचा हिशेब, प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक नेतृत्वावरचा विश्वास—या मुद्द्यांवर प्रचाराची धार अधिक तीव्र झाली आहे. विशेषतः तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील मतदान निकाल ठरवण्यात निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. या भागातील मतदानाची टक्केवारी वाढली तर समीकरणे बदलू शकतात, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
दरम्यान, भोर तालुक्यातून रोजगारासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर उमेदवारांची मोठी मदार आहे. शहरांत व उद्योगक्षेत्रांत कामानिमित्त स्थायिक झालेल्या मतदारांना मतदानासाठी गावाकडे आणण्यासाठी शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संपर्कयंत्रणा, वाहनव्यवस्था आणि आवाहनांचा भडिमार सुरू असून, ‘घरची मतं’ खेचण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे.
शेवटच्या ४८ तासांत प्रचाराची दिशा, कार्यकर्त्यांची हालचाल आणि निर्णायक पट्ट्यांतील मतदान—या घटकांवर भोरची निवडणूक कुणाच्या पारड्यात झुकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

