कापूरहोळ
आरोप-प्रत्यारोपांना ब्रेक; ‘विकासच आमचा अजेंडा’ म्हणत मतदारांना साद
भोंगवली–कामथडी गटातील निवडणूक प्रचार अखेर थंडावला असून, शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी आक्रमक भाषणांऐवजी संयमाची भूमिका घेतली. एकमेकांवर टीका करण्याऐवजी “आम्हीच विकास करणार” असा दावा करत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
या निवडणुकीत पक्षांतरे, तिकीट वाटपातील गोंधळ आणि अपक्ष उमेदवारांची लढत यामुळे चित्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
प्रचाराच्या काळात प्रत्येक उमेदवाराने आपल्या परीने ताकद लावली. राजकारण, अर्थकारण, नातेवाईक, सामाजिक जाळे अशा सर्वच मार्गांचा वापर करून प्रचार करण्यात आला. काही ठिकाणी विकासकामांची यादी मांडली गेली, तर काहींनी भावनिक मुद्द्यांवर भर दिला.
दरम्यान, प्रचार संपत असतानाच सर्व उमेदवारांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदानाची टक्केवारीच निकालाची दिशा ठरवणार असल्याचे चित्र आहे.
आता प्रचार थांबला असून, मतदानाच्या दिवशी मतदार राजा काय कौल देतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

