कापूरहोळ
भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटात सध्या उघडपणे घोडेबाजार सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या वजनानुसार ५० हजारांपासून थेट १ लाखांपर्यंतचे दर लावले जात असून, मतांचा बाजारभाव २ ते ५ हजारांपर्यंत पोहोचल्याची चर्चा गावागावात रंगली आहे. या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकू येत आहे.
मरगळलेल्या बाजारपेठेला जणू निवडणुकीचा आधार मिळाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गटात मातब्बर उमेदवार मैदानात असून, कार्यकर्ते खेचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. कोणाच्या गटात किती वजनदार कार्यकर्ते, आणि मिळणारे अपेक्षित मतदान यावर सौदे ठरवले जात असल्याचे आरोप होत आहेत.
मतदारांसमोर पैशाचे गाजर दाखवले जात असल्याची चर्चा असल्याने, निवडणूक प्रक्रिया धनशक्तीच्या प्रभावाखाली जात असल्याचे चित्र दिसते. “ लोकशाहीत निवडणूक हा जनतेचा उत्सव की पैशांचा खेळ?” असा सवाल सामान्य मतदार विचारू लागला आहे.
या पार्श्वभूमीवर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष उभा ठाकला असून, शेवटी ‘तेल लावलेला पहिलवान’ कोण ठरणार? याकडे साऱ्या मतदारांचे लक्ष लागले आहे.
भोंगवली–कामथडी गटातील हा कथित घोडेबाजार लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
आता निकाल जनतेच्या हाती—पैशाला कौल की मताला? हे निवडणूक निकालानंतरच कळेल.

