कापूरहोळ
राज्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासनाने रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश काढत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आणि संपूर्ण यंत्रणेला टाईम-बाउंड कामगिरीचे निर्देश दिले.
ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तहसीलदारांना २० फेब्रुवारीची डेडलाईन
शासन आदेशानुसार तहसीलदारांनी गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून २० फेब्रुवारीपर्यंत गावनिहाय नकाशे अंतिम करणे बंधनकारक आहे.
तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त पाहणी करून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग सीमा निश्चित कराव्यात. विलंब सहन केला जाणार नसल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
समिती, तपासणी आणि आयोगाची मान्यता
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांची समिती ५ मार्चपर्यंत प्रारूप तपासणार. ११ मार्चपर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर १७ मार्चपर्यंत तपासणी पूर्ण करून तो राज्य निवडणूक आयोगकडे पाठवला जाईल. आयोग ३० मार्चपर्यंत अंतिम मान्यता देणार आहे.
हरकतींसाठी अंतिम संधी
७ एप्रिलपर्यंत हरकतींसाठी जाहिरात, १६ एप्रिलपर्यंत सुनावणी आणि २३ एप्रिलपर्यंत अंतिम निर्णय—अशी स्पष्ट रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ४ मेपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १० नुसार राबवली जात आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी (मुंबई वगळून) आणि राज्य निवडणूक आयोगाला आदेशाची प्रत पाठवण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया मुदत संपण्याच्या सुमारे सहा महिने आधीच सुरू होणार असल्याने राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

