भोंगवली–कामथडी गटात काँग्रेसचा प्रचार शिगेला; वैभव धाडवेंकडून बदलाचे आवाहन

Rajtorannews

कापूरहोळ :

भोंगवली–कामथडी गटात काँग्रेसचा प्रचार जोरात सुरू असून मतदारांमध्ये बदलाची चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेस आयचे अधिकृत उमेदवार वैभव धाडवे यांनी विकासाच्या मुद्द्यावर सध्याच्या राजकारणावर तीव्र टीका करत मतदारांना सजग निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून या मतदारसंघात वीज, पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन, दिवसा होणारा वीज तुटवडा, बंद पडणारी कारखानदारी, बेरोजगारी, खराब रस्ते आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा या समस्या जैसे थे असल्याचे त्यांनी सांगितले. विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक होत असून ठोस रोडमॅपशिवाय निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडून आल्यानंतर विकासाऐवजी ठेकेदारी आणि स्वार्थी राजकारण केले जाते, ही बाब उघड गुपित असल्याचे धाडवे म्हणाले. निवडणुकीपूर्वी मतदारसंघात सक्रिय असणारे नेते निवडणूक संपताच पाच वर्षांसाठी अदृश्य होतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

प्रचारात “नवीन काय करणार?” हा प्रश्नच गायब असल्याचे सांगत, जुन्याच घोषणा आणि जुन्याच चेहऱ्यांची पक्षांतरासह अदलाबदल सुरू असल्याची टीका त्यांनी केली. भोंगवली–कामथडी गटाला आज तरुण, सुशिक्षित आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

“बदल हवा असेल तर तो भाषणातून नव्हे, तर मतदानातून घडवावा लागेल. वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करून काही साध्य होणार नाही. आज निर्णय घ्या, अन्यथा उद्या पुन्हा ‘विकास नाही’ म्हणून ओरड करण्याची वेळ येईल,” असे आवाहन वैभव धाडवे यांनी विशेषतः तरुण मतदारांना केले.

दरम्यान, काँग्रेसच्या प्रचाराला मतदारांकडून छुपा पाठिंबा मिळत असल्याची चर्चा असून आगामी निवडणुकीत वैभव धाडवे हे गेमचेंजर ठरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. विरोधकांमध्ये मात्र हालचालींना वेग आला असल्याचे चित्र आहे.
To Top