राजगड तालुक्यात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ

Rajtorannews
राजगड
गुंजवणे ता. राजगड येथील लिम्हणवाडी रोड लगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवार (दि. ७) रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामस्थ दिलीप कोथमिरे व विकास लिम्हण यांना लिम्हणवाडी रोडच्या कडेला पिवळ्या रंगाचा टी-शर्ट व निळसर रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला एक इसम बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. त्यांनी तत्काळ गावचे पोलीस पाटील बाळू चंदर रसाळ यांना माहिती दिली.
पोलीस पाटील यांनी तातडीने वेल्हे पोलीस स्टेशनला कळवून संबंधित इसमाला ग्रामीण रुग्णालय, वेल्हे येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मृत इसमाचे वय अंदाजे ३६ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, डॉक्टरांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील तपास वेल्हे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एम. काळे व तपासी अंमलदार व्ही. ई. जाधव करीत आहेत. मृत इसमाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू असून, संबंधित इसमाबाबत माहिती असल्यास वेल्हे पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
To Top