भोर तालुक्यात सत्ता संघर्षाला धार. भाजप–राष्ट्रवादी आमनेसामने, निकालांनी राजकीय गणिते ढवळून निघाली

Rajtorannews
कापूरहोळ

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज दि. 9 रोजी जाहीर होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला असून, काही गटांत भाजपने मुसंडी मारली तर काही ठिकाणी राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले आहे.

वेळू–नसरापूर जिल्हा परिषद गटात भाजपचे पोपट सुके यांनी निर्णायक विजय मिळवत राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. वेळू पंचायत समिती गणातून भाजपचे ज्ञानेश्वर पांगारे यांनीही विजय खेचून आणत भाजपची पकड मजबूत केली. मात्र, नसरापूर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे विशाल कोंडे यांनी विजय मिळवत भाजपच्या आव्हानाला रोखले.

भोंगवली–कामथडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम खुटवड यांनी सत्ता अबाधित ठेवली. भोंगवली पंचायत समिती गणात भाजपचे रोहन बाठे यांनी राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावला, तर कामथडी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीच्या तृप्ती खुटवड यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत आपले राजकीय वजन सिद्ध केले.

शिंद–भोलावडे जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण जगदाळे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. शिंद पंचायत समिती गणातून मनिषा कंक आणि भोलावडे पंचायत समिती गणातून राजेश बोडके यांनी विजय मिळवत या भागात राष्ट्रवादीचा झेंडा ठामपणे रोवला.

तर उत्रोली–कारी जिल्हा परिषद गटात भाजपने मोठा राजकीय डाव टाकला आहे. भाजपच्या स्वरूपा संग्राम थोपटे यांनी विजय मिळवत हा गट भाजपकडे खेचून आणला. त्या माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी असून, या विजयामुळे थोपटे गटाचे राजकारण पुन्हा केंद्रस्थानी आले आहे. भोर पंचायत समितीच्या उत्रोली गणातून सुषमा चव्हाण आणि कारी पंचायत समिती गणातून गीता आंबवले यांनी विजय मिळवत तीनही महिला उमेदवार यांनी भाजपची ताकद वाढवली.

या निकालांमुळे भोर तालुक्यातील स्थानिक राजकारण तापले असून, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. कोणाचा गड कोसळला, कुठे सत्ता टिकली आणि कुठे नवे राजकीय समीकरण उभे राहिले — यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येणार हे निश्चित आहे.आता भोर पंचायत समितीचा सभापती कोण होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
To Top