कापूरहोळ
भोर तालुक्यातील केंजळ (ता. भोर) येथे अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (दि. ७) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कृष्णा किरण सोनवणे (वय ५, रा. चाळीसगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. फलटण तालुक्यातील साखरवाडी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांचा केंजळ गावात मुक्काम असून, तेथील एका शेतकऱ्याच्या ऊस फडात ते काम करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा याला शौचास लागल्याने त्याची आई सरलाबाई सोनवणे हिने त्याला शेजारच्या शेताच्या कडेला बसवले होते. मात्र काही वेळानंतर कृष्णा दिसून न आल्याने ऊसतोड मजुरांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. यावेळी कृष्णा हा ऊस फडात रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी भोर येथील जिल्हा उपरुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. हा हल्ला बिबट्याने केला की अन्य कोणत्या वन्यप्राण्यामुळे झाला, याचा तपास वनविभागामार्फत सुरू आहे. दरम्यान, या घटनेबाबत राजगड पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरातील नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

