भोगवली–कामथडी गटात विकासाचा दुष्काळ, फक्त निवडणुकीपुरते चेहरे, तरुण जागा झाला तरच चित्र बदलेल.... वैभव धाडवे

Rajtorannews
कापूरहोळ 

भोगवली–कामथडी गटात विकासाचे ठोस नियोजन कधीच झाले नाही. गेली चाळीस वर्षे ज्या समस्या होत्या—वीज, पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन, दिवसा वीज तुटवडा, बंद पडणारी कारखानदारी, बेरोजगारी, खड्डे पडलेले रस्ते, अपुऱ्या आरोग्य सुविधा—त्याच मुद्द्यांवर आजही निवडणुका लढवल्या जात आहेत. याची कबुली त्या त्या पक्षाचे उमेदवार देत आहेत. विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली जात आहे.

या मतदारसंघाला विकासाचा ठोस रोडमॅप नाही. केवळ जिल्हा परिषद निधीवर उभा असलेला विकासाचा डोलारा म्हणजेच “विकास” असे चुकीचे चित्र रंगवले जाते. गोंडस घोषणांच्या आड जनतेची दिशाभूल केली जाते. निवडून आल्यानंतर विकासाऐवजी ठेकेदारी, स्वनिधी उभारणी आणि त्यातून पुढील निवडणुकीचा खर्च—हा सगळा कारभार उघड गुपित आहे. घर जाळून कोळशाचा धंदा कोणी करत नाही,इथे जो तो स्वतः ची पोळी भाजण्यात दंग आहे.

निवडणुकीत आधी सहा महिने मतदारसंघ पिंजून काढणारे नेते, निवडणूक संपताच पाच वर्षे अदृश्य होतात. पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते, असा गैरसमज पसरवून लोकशाहीची थट्टा लावली गेली आहे. पण आता जनता गप्प बसणार नाही.
धक्कादायक बाब म्हणजे प्रचारात “नवीन काय करणार?” हा प्रश्नच गायब आहे. जुन्याच घोषणा, जुन्याच चेहऱ्यांची अदलाबदल—आज या पक्षात, उद्या त्या पक्षात. विकासाचा नवा अजेंडा नाही, दूरदृष्टी नाही, धाडसी निर्णय नाहीत.

भोगवली–कामथडी गटाला आज तरुण, सुशिक्षित आणि प्रामाणिक नेतृत्वाची नितांत गरज आहे. बदल हवा असेल तर तो भाषणातून नाही, तर मतदानातून घडवावा लागेल. 
अन्यथा मतदान संपल्यानंतर पुन्हा “विकास नाही” म्हणून ओरड करायची वेळ येणारच.

" वेळ निघून गेल्यावर पश्चात्ताप करून काही साध्य होणार नाही.आज निर्णय घ्या—नाहीतर उद्या पुन्हा निवडणुकीची वाट पाहत बसावे लागेल म्हणून राजकारणात तरुणांनी सक्रिय उभे राहणे गरजेचे आहे असे आवाहन भोंगवली कामथडी गटाचे काँग्रेस आय अधिकृत उमेदवार वैभव धाडवे यांनी केले."

To Top