प्रशासन झोपेत, २५ गावांचा जीव टांगणीला!पूल कोसळून दोन महिने; प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका नागरिकांत तीव्र संताप

Rajtorannews
कापूरहोळ 

सुरवड–कोदवडी मार्गावर गुंजवणी नदीवरील जुना लोखंडी पूल २० डिसेंबर रोजी अवजड वाहनाच्या बोजामुळे कोसळून तब्बल दोन महिने उलटले आहेत.  अद्यापपर्यंत प्रशासनाकडून ना तात्पुरता पर्याय, ना कायमस्वरूपी उपाय करण्यात आला आहे. परिणामी परिसरातील २५ गावांचा दळणवळणाचा संपर्क पूर्णतः ठप्प झाला असून नागरिकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.

पूल नाही, रस्ता नाही – तरीही निवडणुका? 
असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यायी मार्ग नसल्याने नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांचे हाल होत असताना प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून स्थानिक नागरिकांनी लोकसहभागातून पुलाच्या बाजूने कच्चा पर्यायी रस्ता तयार केला होता. मात्र निरा–देवघर प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी २१ जानेवारी रोजी गुंजवणी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या जोरदार प्रवाहात नागरिकांनी केलेला रस्ता पूर्णपणे वाहून गेला.

नागरिकांनी रस्ता केला, सरकारने पाणी सोडून वाहून नेला! अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
आज परिस्थिती अशी आहे की शाळकरी मुले अडकतात, दूध व शेतीमालाची वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र नेते भाषणात आणि प्रशासन निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राजगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना, पूल प्रश्नावर तातडीचा निर्णय न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पंचक्रोशीत ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बाळू जाधव (सरपंच, सोंडे हिरोजी), रूपाली झांजे (माजी सरपंच, वडगाव झांजे),दत्तात्रय पानसरे (भागिनघर सरपंच)प्रकाश बढे, ऋषिकेश साबळे, युवराज कार्ले, बापू खोपडे, संदीप सरपाले आदींनी पूल दुर्घटनेनंतर दोन महिने उलटूनही कोणतीही ठोस व्यवस्था न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

२५ गावांचा संपर्क तुटलेला असतानाही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येत नाही ” अशी भावना नागरिकांत असून, तातडीने तात्पुरता पूल व कायमस्वरूपी नवीन पूल उभारावा, अन्यथा तीव्र आंदोलन  करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
To Top