कापूरहोळ
भोर तालुक्यातील राजकीय घडामोडीला वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना पुणे जिल्हा सचिव रोहिदास (आबा) पांडुरंग कोंडे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे भोर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुमारे 18 वर्षे एका विचारधारेसाठी कार्यरत राहिल्यानंतरही न्याय व सन्मान न मिळाल्याने स्वाभिमान जपत हा निर्णय घेतल्याचे आबा कोंडे यांनी सांगितले. “हा केवळ पक्षप्रवेश नसून अन्यायाविरोधातील भूमिका आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला किंमत नसेल तर लढ्याची दिशा बदलणे अपरिहार्य ठरते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी त्यांच्या सोबत संतोष शामराव कोंडे (माजी सरपंच), अक्षय किसन गोळे, समीर पांडुरंग कोंडे, निलेश राजेंद्र कोंडे, प्रवीण पायगुडे, सागर तात्या शिंदे, अक्षय मोळावडे, अजित लाड, अभिजित कोंडे, दीपक ननावरे व सुभाष वाडकर यांनीही काँग्रेस आय पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण, कार्याध्यक्ष शैलेश जाधव, भोर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रोहन भोसले तसेच नसरापूर पंचायत समिती गणाचे काँग्रेस उमेदवार डॉ. विजय शिळीमकर उपस्थितीत होते .
यावेळी भोर तालुका काॕग्रेस पक्ष अध्यक्ष सतिश चव्हाण म्हणाले की, धनशक्तीपेक्षा जनशक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे काँग्रेसमध्ये स्वागत असून, भोर तालुक्यात संघटना अधिक बळकट होईल. काॕग्रेस पक्ष हा भोर तालुक्यात वंचित आघाडी सोबत एकत्रित आलेला आहे. भोंगवली कामथडी जि.प.गटातून वैभव धाडवेपाटील , नसरापूर पंचायत समिती गणांत डॉ. विजय शिळीमकर वेळू गणातून रोहिदास (आबा) कोंडे यांच्या उमेदवारी निश्चित केली आहे. सोमवारी मंगळवारी तालुक्यातील सर्व जागावर सक्षम असे उमेदवार उभे असतील.काँग्रेस आय भोर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे.

