दिग्गजांबरोबर नवख्यांची लढत रंगणार कामथडी-भोंगवली गटात चौरंगी लढतीचे संकेतराजकीय अस्तित्वाची लढाई

Rajtorannews
कापूरहोळ

भोर तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटात दिग्गज उमेदवारांबरोबर नवख्या उमेदवारांची लढत होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस अशी चौरंगी लढत होणार असल्याने इच्छुकानी गावागावात जाऊन मोर्चेबांधणी करत जोरदार तयारी सुरू केली आहे . 

कामथडी-भोंगवली गटात जिल्हा परिषद उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या पक्षात मोठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे व जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विक्रम खुटवड यांनी दंड थोपटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात या गटातून एक जिल्हा परिषद सदस्य व भावी सभापती महिला अशा वाटाघाटीनुसार राष्ट्रवादीमध्ये तोडगा निघू शकतो परंतु जर तोडगा निघाला नाही तर एक जण पक्ष बदली करून दुसऱ्या तिकिटावर लढणार  अशी जोरदार चर्चा आहे.

शिवसेना शिंदे गटातून कुलदीप कोंडे यांनी या गटातून लढण्यासाठी अद्याप संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. परंतु अद्याप तरी दावेदार निश्चित नाही. भाजपकडून माजी उपसभापती रोहन बाठे, माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल लेकावळे, महेश टापरे, तर राजगड कारखान्याचे संचालक के. डी. सोनवणे यांचे चिरंजीव महादेव सोनवणे हे इच्छुक आहेत. काँग्रेस आय पक्षातून वैभव धाडवे पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट तालुक्यातून एकत्रित लढण्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे तुतारीचा उमेदवार या गटात दावेदार दिसत नाही. त्यामुळे भोंगवली कामथडी गटात चौरंगी लढत होणार हे निश्चित मानले जात आहे.

कामथडी गणात महिला आरक्षण असल्याने भाजपकडून सरपंच निता इंगुळकर, सोनम गोळे, शशिकला गोरड, हेमलता धावले, प्राजक्ता पांगारे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना गोरड, सारिका मालुसरे, वैशाली गाडे, शिवसेनेकडून क्रांती धुमाळ, मनीषा पांगारकर, मोनिका जाधव इच्छुक आहेत.तसेच भोंगवली सर्वसाधारण गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गणेश निगडे, उदय शिंदे,अक्षय सोनवणे यांची नावे पुढे येत आहेत. भाजपचे महेश धाडवे, अनिल साळुंखे, वसंत परबळ, विनोद चौधरी, शिवसेनेकडून विकास चव्हाण, हर्षद बोबडे, किशोर बारणे हे देखील रिंगणात उतरणार असून नेमके कोणत्या पक्षातून लढणार हे स्पष्ट केले नाही.

गटातून वैभव धाडवेंची उमेदवारी निश्चित झाल्याने तरुण युवक कामाला लागले आहेत.गेली दोन दशके पत्रकार क्षेत्रात काम करणारे वैभव धाडवे पाटील यांनी देखील त्यांच्या शूरवीर मावळा संघटनाच्या माध्यमातून सामाजिक आणि विधायक कार्यात ठसा उमटविला आहे. वैभव धाडवे हे काँग्रेस आय पक्षातून लढणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.भोर तालुक्यातून काँग्रेस आय पुन्हा नव्याचेहऱ्यांना सोबत घेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे. तालुक्यात काँग्रेस आय पुन्हा उभारी घेणार का हे येणारा काळच ठरवेल.

नव्या चेहऱ्यांचे वर्चस्व निर्णायक ठरणार?
भोर तालुक्यातील जि. प., पं. स.च्या राजकारणावर गेली २० ते २५ वर्षे केळवडे, केंजळ, उत्रोली, हातवे या ठराविक गावांचे वर्चस्व राहीलेले आहे.निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलत असून नवीन चेहऱ्यांना संधी हवी आहे. बदल करण्यासाठी नव्या चेहऱ्यांचे वर्चस्व निर्णायक ठरेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
To Top