सत्तेपेक्षा विचारधारा मोठी; निर्भीड पत्रकार वैभव धाडवे पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Rajtorannews

कापूरहोळ

राजकारणात पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अनेक जण विचारधारेला तिलांजली देताना दिसतात. मात्र भोर तालुक्यातील निर्भीड पत्रकार, अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वैभव धाडवे पाटील यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश केवळ पक्षप्रवेश नसून, लोकशाही मूल्ये आणि विचारधारेच्या लढ्याची ठाम भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पत्रकारितेत कार्यरत असताना सत्य मांडताना कोणत्याही दबावापुढे न झुकणाऱ्या वैभव पाटील यांनी राजकारणात प्रवेश करतानाही तीच भूमिका कायम ठेवली आहे. भीती, सौदेबाजी किंवा तडजोड न करता केवळ लोकांची साथ आणि विचारधारेची ताकद घेऊन राजकारणात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेशावेळी भोर तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश चव्हाण, भोर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष रोहन भोसले, पुणे जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता सचिन खोपडे यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत वैभव धाडवे पाटील भोंगवली कामथडी गटातून काँग्रेस आय पक्षातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.वैभव धाडवे पाटील यांच्या पक्षात प्रवेशामुळे भोर तालुक्यातील काँग्रेसचे संघटनात्मक बळ वाढणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
To Top