कापूरहोळ
आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धासाठी सुरक्षितता, वाहतूक, आरोग्य सुविधा, स्वच्छता, मार्ग व्यवस्थापन यामध्ये कोणतीही त्रुटी नको . प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी स्पष्टपणे पार पाडत पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासनाला सक्त आदेश दिले आहे.
कापूरहोळ (ता. भोर) येथे भोर तालुक्यात 21 जानेवारी रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, ही स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून पुणे जिल्ह्याची प्रशासनिक क्षमता, नियोजन कौशल्य आणि समन्वयाची जागतिक पातळीवर ओळख करून देणारी आहे.
दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी भोर तालुक्यातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या टप्प्याच्या यशस्वी आयोजनासाठी कापूरहोळ येथे पूर्व नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्पर्धेचा मार्ग, वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, आपत्कालीन आरोग्य सेवा, ग्रामपातळीवरील समन्वय, तसेच स्थानिक नागरिकांचा सहभाग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या स्पर्धेच्या निमित्ताने भोर तालुक्यातील ग्रामीण जीवन, निसर्गसौंदर्य आणि पर्यटन क्षमतेची ओळख जगाला करून देणारी असल्याने प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी नमूद केले.
यावेळी भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, पीडीसीसी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, कापूरहोळच्या सरपंच मंगल गाडे, उपसरपंच रविंद्र बाबी गाडे, स्वप्नील कोंडे, गणेश निगडे, सचिन सोंडकर, विश्वास ननावरे, विजय नाना कारभळ, ग्रामविकास अधिकारी एस वाकळे व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्य, विविध गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांचे आजी-माजी चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक भोरचे प्रांताधिकारी विकास खरात यांनी केले, तर आभार तहसीलदार राजेंद्र नजन यांनी मानले. सूत्रसंचालन राजकुमार बामणे यांनी केले.

