कापूरहोळ
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाला अतिरिक्त वेळ दिला असून, आता 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश पूर्वी दिले होते. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात अर्ज दाखल करत मुदतवाढीची मागणी केली होती.
राज्य निवडणूक आयोगाची भूमिका :
राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात आपली बाजू मांडताना राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपलीकडे गेलेली नाही. अशा ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी किमान 10 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्याची विनंती केली होती.
या अर्जावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आयोगाची मागणी मान्य केली. केवळ 10 दिवस नव्हे, तर न्यायालयाने एकूण 15 दिवसांची मुदतवाढ देत 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदा निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणासंदर्भातील अडथळे दूर झालेल्या ठिकाणी निवडणुक घेण्यासाठी आयोगाला आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

