19 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीतून पंढरपूरला प्रस्थान वेळापत्रक जाहीर

Rajtorannews

पायी वारीसाठी वेळापत्रक जाहीर 

कापूरहोळ वार्ताहर 

सुखशोधण्यासाठी मनुष्य सतत धडपड करीत आहे.परंतु त्याला सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून संतानी मनुष्याला पायी वारीचा मार्ग दाखवला आहे.
                 सुखालागी करीशी तळमळ 
                  तरी तू पंढरीशी जाई एक वेळ 
या संतांच्या वचनाची अनुभूती घेण्यासाठी आळंदी ते पंढरपूर पायी वारी एकदा तरी करावी. मगच सुखाची अनुभुती आल्याशिवाय रहात नाही.
जून महिना सुरू होताच वारकऱ्यांना विठुरायांच्या भेटीची ओढ लागते. आषाढी वारीत माऊली.. माऊली... म्हणत आपोआप पाऊले पंढरीचा, मार्गक्रमण करतात. विविध देशांच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या वारीसाठी हजारो दिंड्या येतात. तर, मानाच्या १० पालख्यांसह लाखो वारकरी भक्तीत तल्लीन होऊन विठुनामाचा गजर करत असतात. ऊन, पाऊस, वादळ, वारा कशीचीही तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ घेऊन पुढे चालत असतात. यंदा ६ जुलै रोजी आषाढी एकादशी असून वारकऱ्यांची पायी वारीसाठी आळंदीत गर्दी वाढत आहे.
पंढरीच्या वारीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या मानाच्या पालख्यांमध्ये देहू येथून जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी येते. या दोन्ही पालख्यांची प्रस्थान, आगमन आणि पंढरीतून परतीच्या प्रवासाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, अनुक्रमे १८ आणि १९ जुन रोजी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पायी सोहळा वेळापत्रक खालीलप्रमाणे...
१९ जून – माऊली पालखी प्रस्थान आळंदी (प्रस्थान गुरुवारी आल्यामुळे संध्याकाळी ८ वाजता प्रस्थान होणार)
२० जून – आळंदी ते पुणे
२१ जून – पुणे मुक्काम
२२ जून – पुणे ते सासवड (दिवेघाट वारकरी खेळ)
२३ जून – सासवड मुक्काम
२४ जून – सासवड ते जेजुरी (भंडाऱ्याची उधळण)
२५ जून – जेजुरी ते वाल्हे (जेजुरी खंडोबा दर्शन)
२६ जून – वाल्हे ते लोणंद (माऊलींना निरास्मान व सातारा जिल्हा प्रवेश)
२७ जून – लोणंद ते तरडगाव
२८ जून – तरडगाव ते फलटण
२९ जून – फलटण ते बरड
३० जून – बरड ते नातेपुते (सोलापूर जिल्हा प्रवेश व बरड येथे गोल रिंगण)
१ जुलै – नातेपुते ते माळशिरस (सदाशिवनगर येथे गोल रिंगण)
२ जुलै – माळशिरस ते वेळापूर (खुडूस येथे गोल रिंगण)
३ जुलै – वेळापूर ते भंडी शेगाव (ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा)
४ जुलै – भंडी शेगाव ते वाखरी (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
५ जुलै – वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे गोल रिंगण)
६ जुलै – देवशयनी आषाढी एकादशी
१० जुलै – पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास.

संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक खालीलप्रमाणे...

१८ जून – प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
१९ जून – देहू, निगडी, आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
२० जून – आकुर्डी ते पुणे, नाना पेठ मुक्काम
२१ जून – निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे मुक्काम
२२ जून – पुणे, हडपसर, लोणी काळभोर प्रवास व मुक्काम
२३ जून – लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
२४ जून – यवत ते वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
२५ जून – वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
२६ जून – उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
२७ जून – बारामती, काटेवाडी, सणसर पालखीतळ मुक्काम (काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण)
२८ जून – सणसर, बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास व मुक्काम (बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
२९ जून – निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम (इंदापूर येथे गोल रिंगण)
३० जून – इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास व मुक्काम
१ जुलै – सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
२ जुलै – अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम (माळीनगर येथे उभे रिंगण)
३ जुलै – बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास व मुक्काम
४ जुलै – पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण)
५ जुलै – वाखरी ते पंढरपूर मुक्काम (वाखरी येथे उभे रिंगण)
६ जुलै – एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
१० जुलै – पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात.
To Top