गणरायाच्या स्वागतासाठी ढोल-ताशा पथकांचा जोरदार सराव

Rajtorannews
ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला; तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण
कापूरहोळ 
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच गणेशभक्तांमध्ये उत्साह संचारला असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणरायाच्या भव्य स्वागतासाठी विविध ढोल-ताशा पथकांनीही कंबर कसली असून, सध्या रात्री उशिरापर्यंत सराव सुरू आहे.

ढोलाचा दमदार आवाज, ताशांचा कडकडाट आणि तालबद्ध वादनामुळे सरावाच्या ठिकाणी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सरावात सहभागी होत असून, पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गणरायाच्या आगमन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे यंदाच्या स्वागत मिरवणुकीत उत्कृष्ट वादन सादर करण्यासाठी पथकांकडून विविध ताल, ठेके आणि वादनाच्या कवायतींचा नियमित सराव केला जात आहे. वादनातील एकसंधता, शिस्त आणि तालबद्धता यावर विशेष भर दिला जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावागावांत गणेश मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई, मंडप उभारणी आणि विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे नियोजन केले जात आहे. त्यात ढोल-ताशा पथकांच्या सरावामुळे उत्सवाच्या वातावरणात आणखी रंग भरला आहे.

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह ढोल-ताशांचा निनाद करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गणरायाच्या आगमनाची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे.
To Top