भाडेकरू, कामगारांची माहिती न दिल्यास कारवाई; अवैध धंद्यांना थारा नाही – पोलिस निरीक्षक संतोष जाधव

Rajtorannews
कापूरहोळ  
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व भाडेकरू, परप्रांतीय कामगार आणि मजुरांची संपूर्ण माहिती पोलिस प्रशासनाला देणे आता बंधनकारक करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या घरमालक, ठेकेदार आणि कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा नवनियुक्त राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिला आहे.

राजगड पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच निरीक्षक जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, परिसरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरू व कामगारांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे घरमालक, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि उद्योग व्यवस्थापनाने तातडीने संबंधितांची माहिती पोलिस ठाण्यात जमा करावी.

यावेळी त्यांनी गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांविरोधातही कठोर भूमिका जाहीर केली. अवैध दारूविक्री, मटका, जुगार, तसेच इतर कोणतेही बेकायदेशीर धंदे राजगड परिसरात खपवून घेतले जाणार नाहीत. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

निरीक्षक जाधव म्हणाले, "राजगड परिसर शांतताप्रिय आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडता गुन्हेगारी व संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल."

नवनियुक्त पोलिस निरीक्षकांच्या या कठोर भूमिकेमुळे राजगड परिसरातील अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पोलिस प्रशासन आता अधिक आक्रमकपणे कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
To Top