माजी मंत्री ज्येष्ठ नेते अनंतरावजी थोपटे यांचे निधन

Rajtorannews
 राज्याच्या राजकारणातील एक युग संपले.
कापूरहोळ 

भोर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले माजी मंत्री अनंतराव नारायणराव थोपटे आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या निधनाने भोर तालुक्यासह पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, जनतेचा आधारवड हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
अनंतराव थोपटे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात सामान्य कार्यकर्ता म्हणून केली. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. लोकांशी असलेला त्यांचा थेट संवाद, साधी राहणी आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे ते जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले.महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी शिक्षणमंत्री आणि भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री अनंतराव नारायणराव थोपटे यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. 
त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 11 जानेवारी 1933 रोजी जन्मलेल्या अनंतरावजी थोपटे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख नेतृत्वाची छाप उमटवली. भोर विधानसभा मतदारसंघातून ते तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ग्रामीण भागातील विकास, शिक्षण, सिंचन, रस्ते आणि शेतकरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले. अनंतरावजी थोपटे यांनी महाराष्ट्र शासनात सुमारे 14 वर्षे मंत्री म्हणून विविध महत्त्वाची खाती सांभाळली. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी राज्यातील शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले. त्यांच्या कार्यकाळात भोर तालुक्याच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीचा मार्ग सुकर झाला.
सहकार चळवळ, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी हजारो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, या तत्त्वावर त्यांनी राजकारण केले. त्यामुळे राजकीय विरोधकांमध्येही त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतरही त्यांनी काँग्रेस पक्षाशी निष्ठा कायम ठेवली आणि विधिमंडळात काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून जबाबदारी पार पाडली. 
संयमी, अभ्यासू आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. ग्रामीण शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांसाठी सुविधा आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे भोर परिसरात त्यांना लोकनेते म्हणून विशेष मान मिळाला. राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा अध्याय संपल्याची भावना विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आज त्यांच्या निधनाने भोर तालुक्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याचा ठसा अनेक वर्षे जनमानसात कायम राहील.
.               भावपूर्ण श्रद्धांजली
"माणूस जातो, पण त्याचे कार्य, विचार आणि समाजासाठी केलेले योगदान अमर राहते. अनंतरावजी थोपटे यांचे जीवन हे लोकसेवा, विकास आणि जनसंपर्काचे प्रेरणादायी उदाहरण राहील. भोर तालुका त्यांच्या कार्याची आठवण कायम जपत राहील."

To Top