भोर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलनार
काँग्रेसचा मतदार भाजप सोबत जाणार ?
कापूरहोळ
पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.भोर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलनार असून मतदार संघातील काँग्रेस निष्ठावंत काँग्रेसचा मतदार भाजप सोबत जाणार की. काँग्रेस सोबत राहणार या बाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत.
संग्राम थोपटे यांनी रविवार (दि. २०) रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन भाजपमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भोरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर मंगळवारी (दि. 22) मुंबई येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती त्यांनी दिली
काँग्रेस मधून थोपटे हे तीनवेळा आमदार झाले.परंतु, काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षश्रेष्ठींनी वेळोवेळी डावलले २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव संग्राम थोपटे आणि कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला असून त्यातूनच त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले .
थोपटे यांच्या भाजप प्रवेशाने भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यांच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच राजगड सहकारी साखर कारखान्यापुढील प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे थोपटे समर्थकांचे म्हणणे आहे. संग्राम थोपटे यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने आमंत्रण दिले होते, परंतु त्या वेळी राजकारणाचा अंदाज न आल्याने थोपटे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षासह थोपटे यांचाही मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्तेशिवाय शहाणपण नसते या उक्तीप्रमाणे थोपटे यांनी राजकीय वळण घेतल्याची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील भोर-वेल्हे-मुळशी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आपल्या समूहाचे राजकीय बस्तान त्यांच्याशी जुळणार का, या सर्व बाबींची चाचपणी करूनच थोपटे यांनी हा निर्णय घेतला आहे.
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सध्या तरी कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा भाजपकडून ठेवलेली नसल्याचे त्यांनी सांगितले मात्र, आगामी काळात थोपटे यांना विधानपरिषद अथवा महामंडळाचे पद मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा भाजपला थोपटे यांच्या मुळे ताकद मिळणार आहे. भाजपात जाण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आता तरी राजगड कारखाना व भोरच्या विकासात भर पडेल अशी सर्वसामान्याची चर्चा आहे.